तिरुअनंतपुरम :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केरळातील आमदार के. थॉमस यांची पक्षाच्या कार्यकारीणीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी ही कारवाई केली. थॉमस हे केरळ विधानसभेत कुट्टनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
थॉमस यांना लिहील्या पत्रात अध्यक्ष पवार यांनी म्हटले आहे की, तुमच्याकडून होत असलेल्या गंभीर शिस्तभंगाच्या पार्श्वभूमीवर, तसेच पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांचा खुलेआम अवमान करणे आणि पक्षाच्या सदस्यांवर बेजबाबदार आरोप करणे, खोट्या तक्रारी दाखल करणे हे पक्षाची जनमानसातील प्रतिमा बदनाम करणारे आहे. या कारणामुळे तुम्हाला पक्षाच्या कार्यकारीणीतून काढून टाकण्यात येत आहे.
थॉमस यांनी आपल्याच पक्षाच्या काही सदस्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार राज्य पोलीस प्रमुखांकडे केली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आपल्या पक्ष सहकाऱ्यांनी आपल्या हत्येचा कट रचला आहे असा आरोप त्यांनी केला होता.