केंदूर -शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप उपबाजारातील तीन आडतदारांचे खासगी अहवाल करोनाबाधित आले आहेत. यामुळे इतर आडतदार, व्यापाऱ्यांसह बाजार समितीचे कर्मचारी मिळून तब्बल 34 जणांना आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
पिंपळे जगताप मार्केटमध्ये तरकारी व भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या एका व्यापाऱ्याला करोनाची लागण झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या संपर्कात असलेल्या तीन आडतदारांनी व एका व्यापाऱ्याने शनिवारी (दि. 4) खासगी लॅबकडून करोनाची चाचणी करून घेतली होती. त्यानंतर सोमवारी (दि. 6) यातील तीनही आडतदारांचा अहवाल करोना बाधित आला तर एका व्यापाऱ्याचा अहवाल बाधित नसल्याचा आला आहे.
दरम्यान, तीन आडतदारांना करोनाची लागण झाल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. या मार्केटमध्ये वावर असलेल्या व बाधित आडतदारांच्या थेट संपर्कात आलेल्या तब्बल 34 नागरिकांना विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर दहा लोकासाठी बाजार समितीने विलगीकरण कक्षासाठी शेतकरी निवास उपलब्ध करून दिला आहे.
आम्ही जबाबदार नाही
पिंपळे जगताप मार्केटयार्ड परिसरात यापूर्वी अनधिकृत बाजार भरवला जात होता. तो रोखण्यासाठी बाजार समितीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात पत्र देऊन या अनधिकृत बाजाराची माहिती दिली आहे. असा बाजार भरवला तर त्यास बाजार समिती जबाबदार राहणार नाही. पोलीस प्रशासनाने असा बाजार भरवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असेदेखील त्या पत्रात नमूद केले आहे.