नवी दिल्ली – दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेली आम आदमी पार्टी केंद्रीय तपास संस्था असलेली ईडी आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष यांच्यात चांगलाच संघर्ष सुरू असताना आता दिल्ली भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर टीका केली आहे. केजरीवाल यांनी मोदी यांचा आदर्श घ्यावा असे त्यांनी म्हटले आहे.
तपास संस्थांनी नरेंद्र मोदी यांची चौकशी केली तेंव्हा ते तब्बल १२ तास तेथे बसून होते. केजरीवाल यांनी त्यांचा हा आदर्श घ्यावा असे लेखी यांनी म्हटले आहे. गुजरात दंगल प्रकरणात विशेष तपास पथकाने मोदी यांचीही चौकशी केली होती त्या अनुशंगाने लेखी यांनी हे विधान केले. केजरीवाल यांच्याप्रमाणे ड्रामा आणि भ्रष्टाचार करण्यापेक्षा कोणत्याही आव्हानाचा असा (मोदी यांच्यासारखा) सामना करायला हवा असे त्या म्हणाल्या.
दिल्ली जलबोर्डातील भ्रष्टाचार आणि कथित घोटाळ्यावरूनही त्यांनी आपवर जोरदार टीका केली. या घोटाळ्यात गेल्याच आठवड्यात एका निवृत्त अभियंत्याला आणि कंत्राटदाराला अटक करण्यात अली आहे. त्याचा संदर्भ देताना लेखी म्हणाल्या दिल्लीचे विकासाचे मॉडेल आता व्हेंटीलेटरवर आहे. कोणी विचार करू शकत नाही असा दिल्ली मद्य धोरण घोटाळा हा एक आतापर्यंतचा मोठा घोटाळा झाला आहे आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीची चौकशी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीत आणखी एक घोटाळा समोर आला आहे.
एका प्रकरणात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असल्याचे कालच न्यायालयाला आढळून आले. दिल्लीतील औषध खरेदी घोटाळ्याशी संबंधित हा मामला आहे. त्यात दुय्यम दर्जाची औषधे खरेदी केल्याचे, नियमावलीचे पालन न करता खरेदी केल्याचे आणि ही एकूणच प्रक्रिया सगळ्यांचे उल्लंघन असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेच्या अनुशंगाने नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या की दिल्ली सरकारला केवळ प्रसिध्दीची हाव आहे. कोणतेही मूल्य चुकवून त्यांना सत्तेवर राहायचे आहे. ते केवळ भ्रष्टाचाराचे भुकेलेले आणि हापापलेले आहेत.