नवी दिल्ली – कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार शुक्रवारी नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर पुन्हा हजर झाले.
येथील ईडी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी 60 वर्षीय शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, आपण”कायद्याचे पालन करणारे नागरिक” आहोत आणि म्हणूनच त्यांना नेमके का बोलावले गेले हे माहीत नसतानाही ते ईडी समोर हजर होत आहेत. शिवकुमार हे राहुल गांधी यांच्या सध्या कर्नाटकात असलेल्या भारत जोडो यात्रेची व्यवस्था पाहात आहेत आणि ते राहुल यांच्याबरोबर यात्रेत चालतही आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.
या आधी शिवकुमार हे 19 सप्टेंबर रोजी दिल्लीत ईडीसमोर हजर झाले होते जिथे त्यांना बेहिशेबी मालमत्तेच्या कथित ताब्याशी संबंधित आणखी एका मनी लॉंडरिंग प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यात आली होती.
नॅशनल हेराल्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांसारख्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची ईडीने चौकशी केली आहे.