महेंद्र चव्हाण ः पेरिविंकल इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात
पिरंगुट – आजकाल अभ्यासाबरोबरच खेळ ाला खूप महत्व आहे. अभ्यासाबरोबरच खेळ व त्यात प्रावीण्य प्राप्त करणे खूप अभिमानाची बाब आहे. पेरीविंकलच्या सूस शाखेमधून एक तरी ऑलम्पिकवीर किंवा बॉडी बिल्डर व्हावा. फक्त जिद्द ठेवली व ठरवले तर जगज्जेता होणे अवघड नाही, असे मत मिस्टर इंडिया महेंद्र चव्हाण व्यक्त केले.
सूस (ता. मुळशी) येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शरीरसौष्ठवपटू, मिस्टर इंडिया महेंद्र चव्हाण व पौड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून व शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरवात झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सहायक निरीक्षक रमेश गायकवाड म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ व निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता अभ्यासाबरोबरच खेळाची जोड तितकीच महत्वाची आहे. खेळाने माणूस घडतो व बरेच पैलू खेळाने विकसीत होतात. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, सचिन खोडके, सन्मती चौगुले, क्रीडा शिक्षिका शैला परुळेकर, ज्ञानेश्वर मोरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रफुल्ला पाटील व अमिता जॉनी यांनी केले.