सातारा -जावळी तालुक्यातील कावडी, रांजणी व मुनावळे ग्रामपंचायत अंतर्गत कळकोशी क्षेत्रात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने या ठिकाणी सातारचे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे घोषित केली आहेत.
जावळी तालुक्यातील या तीन गावांच्या प्रतिबंधित क्षेत्रांच्या सीमारेषा पुढीलप्रमाणे आहेत. कावडी – आत येण्याचा मार्ग गाव कमान, बाहेर जाण्याचा मार्ग संतोष गेणदेव मानकुमरे यांच्या घरापर्यंत, सीमारेषा – पूर्वेला हातगेघर शिव, पश्चिमेला विवर शिव, उत्तरेला पानस शिव, दक्षिणेस सायघर डोंगर, मुख्य स्थळ कावडी.
रांजणी – आत येण्याचा मार्ग खोबली खुटवड, जाण्याचा मार्ग जननीमाता रोड, सीमारेषा – पूर्वेला भैरवनाथ मंदिर, पश्चिमेला मेलाची डोंगरवस्ती, उत्तरेला राघववाडी, दक्षिणेस रांजणी गावठाण, मुख्य स्थळ रांजणी. मुनावळे ग्रामपंचायत अंतर्गत कळकोशी वस्ती – आत येण्याचा मार्ग कळकोशी कमान, बाहेर जाण्याचा मार्ग कळकोशी कमान, सीमा रेषा – पूर्वेला मुनावळे, पश्चिमेला कोयना धरण, उत्तरेला कोयना धरण, दक्षिणेस अंबवडे, मुख्य स्थळ कळकोशी वस्ती.
यानुसार बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अन्य व्यक्तींना या क्षेत्रात प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास बंदी आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याची वेळ राहील. या क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारी कार्यालये, व्यक्ती व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवांच्या (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला आदी) वाहतुकीसाठी निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून उपलब्ध होतील.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दूध, भाजीपला, औषधे, किराणा माल आदी घरपोच करायचा आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे व ग्रामपंचायतीच्या अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी, त्यांची वाहने, शासकीय व अन्य अत्यावश्यक सेवांची वाहने यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.