ट्रम्प यांची पोस्ट फेसबुक, ट्‌विटरने केली डिलीट

ह्युस्टन, (अमेरिका) – सोशल मिडीयामधील सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय माध्यम असलेल्या फेसबुकने प्रथमच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली पोस्ट “डिलीट’ करण्याचे धाडस दाखवले आहे. ट्रम्प यांनी करोनाबाबत काही माहिती पोस्ट केली होती. मात्र करोना विषाणूबाबत गैरसमज पसरवणारी कोणतीही माहिती प्रसिद्ध न करण्याचे धोरण फेसबुकने स्वीकारलेले असल्यामुळे ही पोस्ट डिलीट करण्यात येत आहे, असे फेसबुकने म्हटले आहे. 

ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये फॉक्‍स न्यूज चॅनेलसाठी ट्रम्प यांनी दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडीओ होता. ट्रम्प यांच्या प्रचार विभागाच्यावतीने हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला होता. “लहान मुले कोविड-19 बाबत जवळ जवळ रोगप्रतिकारक असतात.’ असे ट्रम्प यांनी या मुलाखतीदरम्यान म्हटले होते.

करोना विषाणूबाबत अद्यापही बरीच माहिती उजेडात यायची आहे. लहान मुलांना कोविड-19 चा संसर्ग होऊ शकतो आणि लक्षणेही दिसत नसताना त्यांच्या माध्यमातून करोनाचा प्रादुर्भाव पसरूही शकतो आहे. त्यामुळे या व्हिडीओतून करोनाबाबत चुकीचा दावा केला जात असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. एखाद्या गटाला कोविड-19 बाबत रोगप्रतिकारक क्षमता आहे हे फेसबुकच्या कोविडबाबतच्या धोरणाचे उल्लंघन करणारे वक्‍तव्य आहे, असे फेसबुक धोरणासंदर्भातील प्रवक्‍ते ऍन्डी स्टोन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ट्रम्प यांची पोस्ट डिलीट केली गेली असून आता त्या लिंकवर “कंटेंट उपलब्ध नाही.’ असा मेसेज येतो आहे. ट्‌विटरनेही या व्हिडीओची पोस्ट डिलीट केली आहे.

फेसबुकने ट्रम्प यांच्या पोस्टला लेबल लावण्याऐवजी ती डिलीट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांच्या पूर्वीच्या पोस्टना फेसबुकने लेबल लावून ग्राहकांसाठी सावधगिरीचा इशारा दिला होता.
जून महिन्यात ट्रम्प यांच्या प्रचारार्थ पोस्ट केलेल्या जाहिराती फेसबुकने हटवल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धादरम्यान तुरुंगात असलेल्या नाझींना राजकीय कैदी संबोधण्याचे संकेत त्या जाहिरातीत दिले गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.