सध्या दिवाळी पार्ट्यांचा जोर आहे. बॉलीवूडमधील कलाकारांच्या पार्ट्याही यंदा चांगल्याच चर्चेत राहिल्या. केवळ पार्ट्याच नव्हे तर या पार्ट्यांमधील कलाकारांच्या वर्तणुकीची, सलगीचीही चांगलीच चर्चा रंगत असते. अशीच चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहे ती विकी कौशल आणि कॅटरिना कैफची. अलीकडेच एका पार्टीमध्ये हे दोघे एकत्र दिसले आणि त्यांच्या नात्याविषयीच्या अफवांना, चर्चांना उत आला. ही पार्टी दोघांच्या कॉमन फ्रेंडची होती.
यासंदर्भातील एका व्हिडिओमध्ये हे दोघेही वेगवेगळ्या गाड्यांमधून या पार्टीला आल्याचे दिसते. या पार्टीमध्ये कॅटरिनाने लाल रंगाचा लहंगा परिधान केला होता आणि ती अत्यंत सुंदर दिसत होती; तर शेरवानी परिधान केलेला विकीदेखील पारंपरिक कपड्यांत छान दिसत होता. हरलीन सेठीशी ब्रेकअप झाल्यानंतर विकी कौशलचे नाव कॅटरिनाशी जोडले जात आहे.
करण जोहरच्या टॉक शोमध्ये कॅटरिनाला “अलीकडच्या काळातील कोणत्या नव्या हिरोसोबत तुला काम करायला आवडेल’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना तिनं विकीचं नाव घेतलं होतं. विकीचं नाव मालविका मोहननशी जोडलं गेलं होतं. “बियॉंड द क्लाऊडस्’ या चित्रपटातून मालविका प्रेक्षकांसमोर आली होती.