संजय लीला भन्साळींना चित्रपट निर्मितीसाठी भलेही बराच अवधी लागत असेल, पण चित्रपटांची घोषणा करण्यासाठी ते जराही उशीर करत नाहीत. “गंगुबाई काठियावाडी’ या नव्या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर भन्साळींनी आपल्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे “बैजू बावरा’. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली आहे.
गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख 11 सप्टेंबर 2020 असणार असून नायिका आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे; तर बैजू बावरा हा चित्रपट 2021 च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. गंगुबाई’च्या प्रदर्शनानंतर लगेचच बैजू बावराचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट अद्याप फायनल व्हायची आहे.
बैजू बावरा हा एक म्युझिकल चित्रपट असणार असून एका संगीतकाराच्या मनातील बदला घेण्याच्या भावनांवर आधारित असेल. 1952 मध्ये बैजू बावरा नावाचा चित्रपट बनला होता. विजय भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात मीनाकुमारी आणि भारतभूषण हे प्रमुख भूूमिकेत होते. बैजू नावाच्या एका गायकाला आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुघल बादशहा सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांमध्ये सहभागी असणाऱ्या सम्राट तानसेनचा बदला घ्यायचा असतो, असे या चित्रपटाचे मध्यावधी कथानक होते.