नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांना त्यांनी कोर्टात अनामत म्हणून भरलेले 20 कोटी रूपये काढून घेण्यास अनुमती दिली आहे. न्यायालयाने त्यांना विदेशात जाण्याची अनुमती देताना ही रक्कम डिपॉझीट म्हणून कोर्टात जमा करण्याचा आदेश दिला होता. जानेवारी 2019 आणि मे 2019 मध्ये विदेशात जाताना त्यांनी कोर्टाकडे अनुमती मागितली होती. त्यावेळी त्यांना प्रत्येक ट्रीपसाठी दहा कोटी रूपयांची अनामत कोर्टात जमा करण्याचा आदेश देण्यात आला होता.
ही रक्कम परत मिळावी म्हणून कार्ती यांनी कोर्टात अर्ज केल्यानंतर ईडीने त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकीट दिले त्यानंतर कोर्टाने त्यांना ही रक्कम काढून घेण्यास अनुमती दिली. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या व्यावसायिक कारणासाठी यावर्षी मे आणि जून महिन्यात अमेरिका, फ्रांस, जर्मनी आणि स्पेन या देशांचा दौरा केला होता.