अध्यक्षांविषयी केलेली शेरेबाजी भोवली
कीव – युक्रेनचे पंतप्रधान ओलेकसी गोंचारूक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी मध्यंतरी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडोमीर झलेन्सकी यांच्या विषयी एक आक्षेपार्ह टिपणी केली होती. अध्यक्षांना अर्थव्यवस्थेतील काहीच कळत नाही असे ते म्हणाले होते. त्यांची ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
आपल्या अध्यक्षांविषयीचे शंकेचे कोणतेही वातावरण राहू नये आणि त्यांचा सन्मान कायम राहावा म्हणून मी माझे राजीनामा पत्र त्यांना सादर केले आहे असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. दरम्यान आपल्या नावावर जी ऑडिओ क्लीप प्रसारीत झाली आहे ती बनावट आहे असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या सरकारच्या मनात अध्यक्षांविषयी कोणताच सन्मान नाही असे वातावरण निर्माण करण्यासाठी ही क्लीप तयार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी या पदावर अध्यक्षांचा देशाविषयीचा कार्यक्रम राबवण्यासाठीच आलो आहे त्यामुळे मी अध्यक्षांविषयी अशी टिपणी करणे अशक्य आहे.