बिजींग – अमेरिकेशी सुरू असलेले व्यापार युद्ध तसेच जागतिक मंदीच्या कारणामुळे चीनचा गेल्या वर्षीचा जीडीपीही 6.1 टक्क्यांवर घसरला आहे. हा गेल्या 29 वर्षातील नीचांक आहे. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती मानली जाते. पण त्या देशाचे गेले 18 महिने अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरू आहे. त्यामुळे चिनच्या आयात मालावर अमेरिकेने मोठी करवाढ लागू केल्याने चिनच्या निर्यातीवर विपरित परिणाम झाला आहे त्याचा मोठा फटका त्या देशाला बसला आहे असे या निमीत्ताने स्पष्ट झाले आहे.
चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटेस्टिकने हा डाटा काल प्रसिद्ध केला. कालच अमेरिका आणि चीन यांच्यात पहिल्या टप्प्यातील व्यापार करार झाला आहे. ही आकडेवारी अर्थव्यवस्थेतील घट दर्शवत असली तरी चीन सरकारने म्हटले आहे की आमची अर्थ व्यवस्था 14.38 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सने विस्तारली आहे. त्या आधीच्या वर्षात ही अर्थव्यवस्था केवळ 12.1 ट्रिलियन डॉलर्स इतकी होती असे सरकारचे म्हणणे आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोणत्याही परिस्थितीत चीनचा विकास दर हा 6 टक्क्यांच्या वरच असला पाहिजे असा आदेश दिला होता. तो 6.1 टक्के असा नोंदवला गेल्याने चीन सरकारच्या अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार बहुतांशी अमेरिकशी होणाऱ्या व्यापारावर अवलंबून आहे. अमेरिकेने चीनच्या आयात मालावर तब्बल 25 टक्के दराने कर आकारणी सुरू केली आहे. सध्या चीन अमेरिकेला दरवर्षी सरासरी 360 अब्ज डॉलर्स इतका माल निर्यात करीत असते. चीनबरोबर दुसऱ्या टप्प्याचा करार होई पर्यंत करांची पातळी हीच राहील असे अमेरिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील करार होई पर्यंत चीनच्या जीडीपीत वाढ होण्याची शक्यता नाही असे संबंधीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे.