बेंगळुरू – कर्नाटकातील भाजपच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ भाजप नेते व माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की भाजपला जय किंवा पराजय हे नवीन नाही. पण आम्ही या निकालाचे आत्मपरीक्षण करू. या निकालामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आम्ही पक्षाला बसलेल्या झटक्याबद्दल आत्मपरीक्षण करू.
हा निकाल मी आदरपूर्वक स्वीकारतो, असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. कर्नाटकातील निवडणुकांपूर्वी येडियुरप्पा यांना भाजपने दूर सारले होते. त्यामुळे ते बराच काळ निष्क्रिय राहिले होते व नंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचीही घोषणा केली होती.
पण त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक काळात मुख्यमंत्री बोम्मई हे फारसे प्रभावी ठरत नाहीत हे दिसून आल्यानंतर भाजपश्रेष्ठींनी पुन्हा येडियुरप्पा यांना गळ घालून त्यांना पुन्हा सक्रिय केले होते. त्यामुळे ते या प्रचारात अनेक ठिकाणी दिसले. तथापि, त्यांनी हातचे राखूनच पक्षाचा प्रचार केला असेही सांगितले गेले.