कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मार्गी; काँग्रेस व जेडीएसमधून आलेल्या 2 बंडखोरांना संधी

बंगळूर – कर्नाटक मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार अखेर बुधवारी मार्गी लागला. त्यानुसार, 7 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कॉंग्रेस आणि जेडीएसमधून बाहेर पडून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या दोघांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले.

कॉंग्रेस आणि जेडीएसमधील बंडखोरीमुळे त्या पक्षांचे आघाडी सरकार 2019 या वर्षाच्या मध्यात कोसळले. त्या पक्षांच्या 17 आमदारांनी केलेल्या बंडामुळे पुन्हा कर्नाटकची सत्ता मिळवण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाला.

बंडखोरांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी दिले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी ते बऱ्याच कालावधीपासून प्रयत्नशील होते. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा हिरवा कंदील मिळण्यासाठी त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. नव्या मंत्र्यांमध्ये तिघे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यातील दोघे कॉंग्रेस आणि जेडीएसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी बनले आहेत.

येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री बनल्यापासून कर्नाटक मंत्रिमंडळाचा 17 महिन्यांत तिसऱ्यांदा विस्तार झाला आहे. विस्तार करतानाच एका मंत्र्याला वगळण्याचे सूतोवाच येडियुरप्पा यांनी केले आहे. त्यामुळे त्या राज्यातील एक मंत्रिपद रिक्त राहण्याची शक्‍यता आहे. कर्नाटक मंत्रिमंडळात जास्तीतजास्त 34 मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.