कराड दक्षिणला 72 तर उत्तरेत सरासरी 70 टक्के मतदान

मातब्बरांचे भवितव्य मशिन बंद, निकालाकडे सर्वांच्या नजरा

कराड  – विधानसभा व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कराड दक्षिणमध्ये सरासरी 72 टक्के तर कराड उत्तरमध्ये 70 टक्के मतदान पार पडले. दोन्ही मतदार संघात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, कराड शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी मतदारांची सायंकाळी पाच नंतर मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने वेळेत आलेल्या मतदारांची मतदान करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालली.

लोकसभा पोटनिवडणुकीचे आघाडीचे उमेदवार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कराड दक्षिणचे विधानसभेचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर कराड उत्तरचे विधानसभेचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी कराडच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी रेठरे तर उत्तरचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी गोरेगाव वांगी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या सोमवारी रात्री उशिरा पर्यंत येथील बहुउद्देशीय हॉल व शासकीय गोडाउन येथे जमा करण्याचे काम सुरु होते.

रविवारी दुपारपासून कराड तालुक्‍यात पाउस सुरु होता. त्यामुळे मतदान केंद्राकडे जाणार्या शासकीय कर्मचार्यांचे मोठया प्रमाणात हाल झाले. मात्र सोमवारी वरुण राजाने दिवसभर साथ दिल्याने मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. कराड दक्षिणेत एकूण 45 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही, व्हीडीओ कॅमेर्यांसह विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. तर कराड उत्तरेतील चार मतदार केंद्रांसह आवश्‍यक असणार्या 34 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही तसेच व्हिडीओ कॅमेर्याद्वारे वॉच ठेवण्यात आला होता. मात्र कुठलेही अनुचित प्रकार घडला नाही.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मलकापूर येथील सहाय्यक मतदान केंद्रासह 306 मतदान केंद्र तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 363 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभा निवडणूकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीनची सोय करण्यात आली होती. दक्षिणेत 71 ईव्हीएम मशीन आणि 72 व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय कराड शहरातील सर्व 32 मतदान केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवला होता. तर दक्षिणेतील 13 मतदान केंद्राचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली होती.

ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
कोयना वसाहत, बनवडी येथे ईव्हीएम बंद पडले होते, काही वेळात दुसरे मशीन उपलब्ध करण्यात आले. चौगुले मळा येथे दोन मशीनमध्ये बिघाड झाला होता. पाटण विधानसभा मतदार संघात धुईलवाडी येथे सकाळी 9.30 वाजता ईव्हीएम बंद पडले होते, तेथे 11.15 वाजता नवीन ईव्हीएम देण्यात आल्यानंतर मतदान सुरू झाले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शेवाळेवाडी, कराड व मलकापूरमधील दोन अशी चार मतदान केंद्रे तर कराड उत्तर मधील नागठाणे, मत्यापूर, पाल आणि मसूर येथील मतदान केंद्रे संवेदनशील मानली जातात. या आठही मतदार केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.