नवी दिल्ली : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून सध्या देशभरात चांगलेच वातावरण तापले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जात आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या अत्यंत संवेदनशील प्रकरणामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण करणाऱ्या कंगना राणावतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. कंगना राणावतने इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने महिला स्विमिंग सूटमध्ये बीचवर बसल्याचा आणि बुरख्यातील असा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “इराण. १९७३ आणि आता. पन्नास वर्षात बिकिनीपासून ते बुरख्यापर्यंत. जे इतिहासापासून धडा घेत नाहीत ते इतिहासाची पुनरावृत्ती करतात”
कंगनाने हा फोटो कॅप्शनसहित शेअर करताना लिहिलं आहे की, “जर तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालून दाखवा. मुक्त होण्यास शिका, स्वत:ला पिंजऱ्यात अडकवू नका”.