जरा मोबाईल बाजूला ठेवा

आजकाल मोबाईल ही अत्यावश्‍यक गोष्ट बनली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या तीन अत्यावश्‍यक गोष्टींच्या जोडीला मोबाईल ही चौथी गोष्ट बनली आहे. जगण्यासाठी श्‍वास घेणे जितके आवश्‍यक, तितकेच आजकाल हातात वा कानाशी मोबाईल असणे आवश्‍यक बनले आहे. आपल्याशी कोणी बोलत असताना फोन पाहणं, फोन घेणं, मेसेजना उत्तर देणं असले उद्योग करणारे सतत दिसत असतात. घरीही आणि बाहेरही. त्याला काही धरबंधच राहिलेला नाही. असे इतर काम करत असतानाही सतत मोबाईलमध्ये गुंतून राहणे याला फबिंग करणे असे म्हटले जाते. या सवयीचा आणि तिच्या अतिरेकाचा दुष्परिणाम नातेसंबंधांवर होतो ही गोष्ट अगदी सोळा आणे म्हणतात तशी सत्य आहे. आणि खरं सांगायचं, तर आपल्यापैकी बहुतेक या फबिंगला बळी पडलेलो आहोत. तेव्हा आता याविषयी विचार करायलाच हवा.

उदाहरणार्थ तुम्ही खूप चिंतेत आहात. मनातली खदखद कोणालातरी सांगायची आहे. तुम्ही अगदी जवळच्या व्यक्तीला तळमळीने सांगायला सुरुवात करता. आपला त्रास, मनाचा कोंडमारा आणि सगळी जळजळ व्यक्त करायला लागता. तुम्ही बोलत असताना मात्र समोरील व्यक्ती हातातील मोबाइलवर काही तरी खाटखुट करत बसते. तुमचा संताप होतो, चीड येते आणि निराशाही येते, पण करणार काय?

आभासी मीडियामध्ये गुंतून समोरच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे हा मोबाईलचा एक मोठा गुण. याला’फबिंग’ म्हणतात, आणि तसे वागणाऱ्याला ‘फबर’ म्हणतात. यामुळे जीवनातील जवळचे नातेवाईक, मित्र एकमेकांपासून दूर चालले आहेत. फब होणाऱ्यांच्या चिंता वाढून ते नैराश्‍येच्या गर्तेत ओढले जात आहेत, असा निष्कर्ष मनोवैज्ञानिक तज्ज्ञांनी मांडला आहे. ‘जर्नल ऑफ अप्लाइड सोशल सायकॉलॉजी’ या शास्त्रीय नियतकालिकाच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासपूर्ण संशोधनात या फबिंगबद्दल विवेचन करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या आधारे प्रसिद्ध झालेल्या या प्रबंधातील काही निष्कर्ष मनोरंजक तर आहेतच; पण ते आजच्या प्रगत आणि तंत्रज्ञानाच्या मागे धावणाऱ्या जगातील मानवी संबंधांवर प्रकाश टाकणारेही आहेत.

या संशोधनात तीन मिनिटांचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. यामध्ये दोन व्यक्ती संभाषण करत असतात. त्यातील एक जण दुसऱ्याशी बोलत असताना, दुसरा मात्र मोबाइलवर फोन घेणं, मेसेज वाचणं, मेसेज टाइप करणं, असे करत असतो. यात व्हिडिओ पाहणाऱ्यानं पहिल्या व्यक्तीच्या जागी आपण स्वतः आहोत, अशी कल्पना करायची होती. चित्रफीत संपल्यावर त्यांना एक प्रश्‍नावली देण्यात आली. त्यात दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मांडल्यावर त्या सर्वांचं विश्‍लेषण करण्यात आलं. या संशोधनासाठी केलेल्या पाहणीनुसार पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, मित्र, मुलं-पालक, गिऱ्हाईक-दुकानदार यांच्यामध्ये या प्रकारे फबिंगच्या घटना रोजच्या रोज होत आहेत. त्यामुळे या सर्वच संबंधात दुरावा निर्माण होतो आहे. एकमेकांतील शाब्दिक संभाषणावर नात्यातील घट्टपणाची वीण अवलंबून असते. फबिंगच्या प्रत्येक घटनेमुळे संभाषणातील भावनिक ओलावा नष्ट होतो, दुरावा वाढतो, समज-गैरसमज जन्माला येतात. एकमेकांमधील नातेसंबंध दोहो बाजूंनी असमाधानकारक बनत जातात.

आपले मित्र-मैत्रिणी, पती-पत्नी, यांच्याबाबत ही समस्या येत असेल, तर याविषयी टोमणे न मारता मोकळेपणानं चर्चा करणं गरजेचं आहे. या संबंधातील व्यक्तींनी बोलताना, गप्पा मारताना, एन्जॉय करताना सर्वांनीच ठरवून फोन बाजूला ठेवायला हवेत. नात्यामध्ये फोन महत्त्वाचा की समोरची व्यक्ती, हे ठरवून घ्यावंच लागतं. सोशल मीडियामधील विश्‍व कितीही मोहक वाटले, तरी ते आभासी असतं. आपले स्नेहीसंबंधी आणि आयुष्याचे जोडीदार आपल्याला सदोदित आणि आयुष्यभरासाठी लागणार आहेत, ही जाणीव प्रत्येकाने वेळोवेळी ध्यानात ठेवावी. आणि त्यावर उपाय म्हणून दिवसातील काही वेळ, महत्त्वाच्या प्रसंगी मोबाईल जरा बाजूला ठेवायला हवाय.

– मृणाल गुरव

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×