जुन्नरचा ऐतिहासिक ‘पद्मावती’ ओव्हरफ्लो

जुन्नर – किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी सोमतवाडी (ता. जुन्नर) येथील ऐतिहासिक पद्मावती तलाव गेल्या चार दिवसांच्या पावसाने रविवारी (दि. 30) सायंकाळी भरून वाहू लागला. यामुळे सोमतवाडी व परिसरातील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. पूर्वी या तलावातून खापराच्या जलवाहिन्यांतून जुन्नर शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येत होता.

कुकडी नदीवरून नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर ही योजना बंद पडली. मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे हा तलाव भरला नव्हता तर, यावर्षी पावसाळ्यास सुरवात झाल्यापासून परिसरात चांगला पाऊस न झाल्याने तलाव कोरडाच राहिला होता. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. चार दिवसांपासून पावसाने येथील ओढे, नाले वाहू लागले व तलावात पाणी येऊ लागले. बघता बघता तलाव भरून रविवारी सांडव्यावरून पाणी वाहू लागले. तलाव भरल्याने सोमतवाडी, तुळजाबाईची ठाकरवस्ती, कबाडवाडी येथील भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला असून शेतकरी आनंदी झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.