मुंबई – जॉनी डेप तब्बल 25 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा दिग्दर्शक बनण्यासाठी सज्ज झाला आहे. जॉनीने त्याच्या आगामी ‘मोदी’ चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा केली आहे. तो या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. जॉनी डेपने खुलासा केला आहे की तो ‘मोदी’ मध्ये इटालियन कलाकार अमेदेओ मोदीग्लियानीची कथा मांडणार आहे. पायरेट्स ऑफ कॅरेबियन या चित्रपटामुळे जॉनीची जगभर समुद्री लुटेरा अशी ओळख झाली. आजही सर्वसामान्यांना जॉनी म्हंटल कि तोच बोटीवरील खुंखार डाकू आठवतो.
भारतीयांना मोदी हे नाव खूप परिचयाचे आहे.मात्र या चित्रपटाचा आणि भारताचा काहीही संबंध नाही. ‘मोदी’चे शूटिंग बुडापेस्टमध्ये होणार आहे. हा चित्रपट डेनिस मॅकइन्टायर यांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित आहे. जॉनी डेप दिग्दर्शित, यात चित्रकार आणि शिल्पकार मोडिग्लियानी यांचा पॅरिसमधील 1916 मधील काळ दाखविला जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ‘मोदी’ चित्रपटात इटालियन स्टार ‘रिकार्डो स्कामार्सिओ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जो ‘जॉन विक: चॅप्टर 2’, ‘द बेस्ट ऑफ यूथ’ आणि पाओलो सोरेंटिनोच्या ‘लोरो’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. पियरे नैनी आणि दिग्गज अभिनेता अल पचिनो यांचीही निवड या चित्रपटासाठी करण्यात आली आहे.
डेप २५ वर्षांनंतर दिग्दर्शन करणार आहेत
जॉनी डेप जवळपास तीन दशकांनंतर ‘मोदी’साठी दिग्दर्शकाच्या जागेवर परतला आहे. 1997 मध्ये त्याने शेवटचा ‘द ब्रेव्ह’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात डेप आणि मार्लन ब्रँडो यांनी अभिनय केला होता. सध्या डेप त्याच्या कमबॅक चित्रपट ‘जीन डू बॅरी’ च्या वर्ल्ड प्रीमियरची तयारी करत आहे.