नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन भारत भेटीवर येणार नाहीत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ज्यो बायडेन भारत भेटीवर येणार असल्याचे गृहित धरून त्याच कालावधीमध्ये नवी दिल्लीत क्वॉड परिषदेचेही आयोजन करण्याचे ठरले होते.
मात्र आता बायडेन हे प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून येऊ शकणार नसल्यामुळे आता क्वॉड परिषद पुढील वर्षी जानेवारीच्याऐवजी याच वर्षाच्या अखेरीस नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे निमंत्रण दिले असल्याचे अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते. मात्र भारत किंवा अमेरिकेकडून त्या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिला गेलेला नव्हता.
जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असेल. ते लक्षात घेऊन बायडेन यांनी या भेटीला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे मानले जाते आहे.