नागपूर – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित चित्रपटाने चांगली कमाई केली होती. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत होते. या चित्रपटात प्रियांशू क्षत्रियने बाबू नावाचे पात्र साकारले होते. “अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?”, हा त्याचा डायलॉग फारच लोकप्रिय ठरला होता.
दरम्यान, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रियला नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावे यांच्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेले होते. याप्रकरणी मोंडावे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मोंडावे कुटुंबाच्या नागपुरातील राहत्या घरातून हा ऐवज चोरी झाला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा त्याने केला. दरम्यान पोलीस आता या प्रकरणात कसून चौकशी करत आहे.