नवी दिल्ली -झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले आहे. त्यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी 14 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सोरेन यांचा मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) रांचीमधील ईडीच्या कार्यालयात जबाब नोंदवून घेण्यात येईल. नेमक्या कुठल्या प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले याविषयीची माहिती तातडीने मिळू शकली नाही. झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते असणाऱ्या सोरेन यांची याआधी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने चौकशी केली होती.
अवैध खाणकामाशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती चौकशी झाली होती. सोरेन झारखंडमधील आघाडी सरकारचे नेतृत्व करतात. त्या आघाडीत झामुमो, कॉंग्रेस आणि राजद या पक्षांचा समावेश आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नुकतीच इंडिया या नावाने आघाडी स्थापन केली. त्या आघाडीत झारखंडमध्ये सत्तेवर असणाऱ्या तिन्ही पक्षांचाही समावेश आहे.
विरोधकांची आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. अशात सोरेन यांना ईडीने समन्स बजावल्याची घडामोड घडली आहे. त्यामुळे विरोधकांच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.