जेजुरी-जेजुरी नगरपरिषदेने व राज्याच्या नगर विकास प्रशासनाने वाढविलेल्या अवाजवी घरपट्टी वाढीविरोधात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था मंडळे, व्यावसायिक, व्यापारी यांच्यावतीने बुधवारी (दि. 11) शहर बंदची हाक देण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्रक काढण्यात आले आहे.
यावर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष रमेश गावडे पाटील, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई ,विश्वस्त संदीप जगताप, अजय सावंत, विशाल बारभाई, धनंजय गोडसे, प्रसाद अत्रे, मेहबूब पानसरे, प्रशांत लाखे, राजेंद्र खाडे, नंदकुमार निरगुडे आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बुधवारी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा निघणार आहे. शहराच्या मुख्य चौकातून फेरी मारून नगरपालिका चौकात निषेध सभा होणार आहे.