“जेईई मेन्स’ आणखी सोपी!

परीक्षा पद्धतीत बदल होण्याच्या हालचाली
भौतिक, रसायनशास्त्र, गणिताचे प्रश्‍नही कमी होणार  

पुणे – अभियांत्रिकी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची जानेवारी 2020 मध्ये होणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात जेईई मेन परीक्षेच्या स्वरूपात बदल होणार आहे. त्यानुसार आता गणित हा विषय घेऊन इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा देता येणार आहे. तसेच जेईई मेन पेपरमध्ये भौतिक, रसायनशास्त्र आणि गणिताचे प्रश्‍नही कमी होणार आहेत. त्यामुळे जेईई मेन परीक्षेची काठिण्यपातळी कमी होण्याची चिन्हे आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) राष्ट्रीय पातळीवरील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, बॅचरल ऑफ आर्किटेक्‍चर, बॅचरल ऑफ प्लॅनिंग या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी जेईई मेन्स प्रवेश परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेच्या प्रश्‍नांमध्ये बदल करण्यात आला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी जेईईच्या परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विषयांवर प्रत्येकी 30 प्रश्‍न विचारण्यात येत होती. यंदापासून या प्रश्‍नांची संख्या 25 करण्यात आली आहे.

यापैकी 20 प्रश्‍ने बहुपर्यायी तर, उर्वरित 5 प्रश्‍नांची उत्तरे ही “संख्यात्मक’ स्वरूपात असतील. याशिवाय इयत्ता बारावीत गणित विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला, जेईईची परीक्षा देऊन बॅचलर ऑफ प्लॅनिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. यापूर्वी, ही परीक्षा देण्यासाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषय अनिवार्य होते. याशिवाय चित्रकलेचा पेपर यंदा राहणार नसून, त्याऐवजी 25 बहुपर्यायी प्रश्‍न विचारण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा बॅचरल ऑफ प्लॅनिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

याशिवाय बॅचरल ऑफ आर्किटेक्‍चर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेत गणिताशी संबंधित 25 प्रश्‍न विचारण्यात येणार आहे. त्यापैकी 20 बहुपर्यायी प्रश्‍न राहणार असून, उर्वरित पाच प्रश्‍न वस्तुनिष्ठ स्वरुपाची राहणार आहेत. चित्रकलेविषयी तीनऐवजी दोन प्रश्‍न विचारण्यात येणार आहेत. याशिवाय 50 गुणांची गणितीय व तर्कशास्त्र विषयांवर बहुपर्यायी प्रश्‍नांवर आधारित “ऍप्टिट्यूड टेस्ट’ राहणार असून, ही परीक्षा बॅचरल ऑफ आर्किटेक्‍चर आणि बॅचरल ऑफ प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठीही राहणार आहे.

परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

जेईई मेन्स प्रवेश परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यत संकेतस्थळावरुन अर्ज भरता येणार आहे. ही परीक्षा येत्या 6 ते 11 जानेवारीदरम्यान होणार असून, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या प्रवेश परीक्षेची माहिती “एनटीए’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.