पूजा भाडळे यांचा पराभव : काळे वाघोलीच्या 27 व्या उपसरपंच
वाघोली-वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये ग्रामविकास पॅनलच्या जयश्री काळे यांनी वाघेश्वर पॅनलच्या पूजा भाडळे यांचा चार मतांनी पराभव करून विजय मिळविला. काळे यांना 11 तर भाडळे यांना 7 मते मिळाली. वाघोली ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणुकीतील काळे या सहाव्या तर वाघोली ग्रामपंचायतीच्या 27 व्या उपसरपंच म्हणून विराजमान झाल्या आहेत.
श्रीकांत वाघमारे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सोमवार (दि. 14) रोजी उपसरपंचपदाची निवडणूक जाहीर केली होती. उपसरपंच पदासाठी ग्रामविकासच्या जयश्री काळे तर वाघेश्वरच्या पूजा भाडळे व महेंद्र भाडळे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याच्या वेळेमध्ये महेंद्र भाडळे यांनी अर्ज माघारी घेतला. जयश्री काळे व पूजा भाडळे यांचा अर्ज राहिल्याने निवडणूक लावण्यात आली. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये काळे यांना 11 तर भाडळे यांना 7 मते पडली. चार मताधिक्याने जयश्री काळे यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयानंतर भंडाऱ्याच्या उधळणीत जल्लोष साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे ढोलताशांच्या गजरात गावामध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली.
- वाघेश्वर पॅनेलचा सदस्य फुटला?
उपसरपंच निवडणुकीसाठी वाघेश्वर पॅनलकडे 8 व ग्रामविकास पॅनलकडे एक अपक्षासह 10 मतसंख्या होती. उपसरपंचपदासाठी झालेल्या गुप्त मतदानानंतर ग्रामविकास पॅनलच्या जयश्री काळे यांना 11 मते पडली तर पूजा भाडळे यांना 7 मते पडली. काळे यांना 10 मते तर भाडळे यांना 8 मते पडणे अपेक्षित होते. परंतु काळे यांना एक अधिकचे मत पडले. भाडळे यांना एक मत कमी पडले. मतदानानंतर दोघांना पडलेली आकडेवारी अचंबित करणारी आहे. त्यामुळे वाघेश्वर पॅनलचा एक सदस्य फुटला? की चुकून मतदान झाले, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.