मोक्काच्या गुन्ह्यात पाहिजे असलेले संशयित आरोपी
पुणे: सकाळी दूध आणि भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना हेरून दुचाकीवर येऊन त्यांच्या सोनसाखळ्या चोरी करणाऱ्या दोन सराईत सोनसाखळी चोरांना खडकी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 लाख 23 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
भारत उर्फ सोनू महनोहर चावरे (28, रा. समर्थ टॉवर्स शेजारी, आदर्शनगर ओमकार कॉलनी, देहुरोड रावेत मुळ रा. पिंपळगाव नजी, लासलगाव ता. निफाड, जि. नाशिक) आणि एसबीर नरेश चौहान (28, रा. श्रीनगर, मराठे चाळ, देहुरोड मुळ रा. कर्जत रेल्वे स्टेशन जवळ, भिसेगाव, गुंडजे कर्जत, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडे केलेल्या तपासात त्याच्यावर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालयात खडकी, भोसरी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात संघटीत गुन्हेगारी करून खून केल्याबाबत गुन्हा दाखल आहेत. त्या गुन्ह्यात ते फरार आहेत.
दि. 18 मार्च ला उषा विनोद जिवाजिवार (70, रा. जुना खडकी बाजार, खडकी) या सकाळी सकाळी त्यांची मैत्रिण राजश्री उपलेचवार यांच्यासह पायी दुध व भाजीपाला आणण्यासाठी जात होता. सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सोनार गल्ली येथे आले असता अचानक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघेजण अचानक आले. त्यांनी उषा यांची सोनसाखळी हिसका मारून चारून नेली. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटिव्ही फुटेज व तांतित्रक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला. सीसीटिव्ही फुटेजवरून संशयीत आरोपींचा वर्णणावरून शोध घेत असताना 26 मार्च रोजी तपास पथकात नमणुकीस असलेल्या पोलिस नाईक किरण घुटे, पोलीस शिपाई संदीप गायकवाड, अनिरूध्द सोनावणे, गणेश चिमटे यांना सोनसाखळी करणारे ते दोघेजण होळकर ब्रिज थांबले असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार दोघांना सापळा रचून अटक करण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी यापूर्वीही पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे शहर आयुक्तालयात असे गुन्हे केल्याची कबुली दिली. ते करत असलेल्या चोरीच्या पध्दती बद्दल विचारणा केली. यामध्ये ते वापरत असलेली पध्दतही उघड झाली.
अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी, सहायक पोलिस फौजदार तापकीर, ठोकळ, पोलीस कर्मचारी सावंत, पवार, लोखंडे, घुटे, कराळे, गायकवाड, सोनवणे, चेमटे यांनी ही कारवाई केली.