जिल्ह्यात प्रथमच खेड तालुक्यातील 10 केंद्रातील 300 डॉक्टरांना पीपीई कीट प्रदान
राजगुरूनगर- खेड तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची तपासणी करता यावी यासाठी डॉक्टरांना 300 पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किटचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील प्रथमच खेड तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना चाकण येथील ब्रिस्टोन लिमिटेड, फोर्ब्स मार्शल लिमिटेड या कंपन्यांकडून पीपीई किट देण्यात आले आहे. देशात करोना विषाणूची चिंता निर्माण झाली आहे. रुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टरांमध्ये भीतीजन्य वातावरण होते. ही गरज ओळखून खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी बी गाढवे यांनी चाकण एमआयडीसीमधील ब्रिस्टोन लिमिटेड, फोर्ब्स मार्शल लिमिटेड कंपन्यांशी संपर्क साधून पीपीई किटसाठी निधी मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार सामाजिक दायित्व निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये उपलब्ध करून दिले आहे.
फोर्ब्स मार्शलच्या डायरेक्टर राठी फोर्ब्स, बिना जोशी, ब्रिस्टोन सामाजिक दायित्व विभागाच्या हेड राणू कुलश्रेष्ठ, बी. आर. त्रिपाठी, मनोज दास यांनी हे किट कोईम्बतूर येथून उपलध करून दिले आहे. तर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर याना एन-95 मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या किटचे वाटप गुरुवारी (दि. 2) सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अमर कांबळे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी बी बी गाढवे यांच्या उपस्थितीत झाले. याबाबत खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे म्हणाले,
- करोना रुग्णांच्या संख्या लक्षात घेता आणि तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची गरज लक्षात घेऊन पीपीई किट मिळण्यासाठी चाकणच्या ब्रिस्टोन, फोबस मार्शलकडे मागणी केली होती त्यांनी तत्काळ सामाजिक दायित्व निधीतून याला मान्यता देत निधी उपलब्ध केला त्यातून तालुक्यात 300 पीपीई किट उपलब्ध झाले असून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना ते देण्यात आले आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना आता अडचण येणार नाही.
– अंकुश राक्षे, सभापती, पंचायत समिती, खेड तालुका