टोकियो (जपान): दक्षिण कोरियाला “जी-7′ संघटनेमध्ये सहभागी करून घेण्याच्या अमेरिकेच्या संभाव्य हालचालींना जपानने विरोध केला आहे. चीन आणि उत्तर कोरियाबाबतची भूमिका दक्षिण कोरियाने “जी-7’देशांसमोर स्पष्ट केलेली नाही, असे जपानमधील क्योदो या वृत्तसंस्थे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 मे रोजी “जी-7′ संघटनेमध्ये रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारताला सहभागी करून घेण्याची कल्पना मांडली होती. या देशांना या वर्षी होणाऱ्या “जी-7′ परिषदेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असे त्यांनी म्हटले होते. “जी-7′ ही संघटना आता कालबाह्य झाली आहे. जगात काय घडामोडी घडत आहेत.
त्याचे प्रतिबिंब या संघटनेमध्ये योग्यरितीने उमटण्यासाठी या संघटनेत योग्य प्रतिनिधीत्व नसल्याचा आक्षेपही ट्रम्प यांनी घेतला होता. म्हणूनच या संघटनेची व्याप्ती आणखीन वाढवण्याची आपली ईच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती.
ट्रम्प यांनी हे निवेदन दिल्यानंतर लगेचच जपानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर विचारविमर्श केल्यावर त्याला आक्षेप घेतला आहे. दक्षिण कोरियाला “जी-7’मध्ये सहभागी करून घेणे म्हणजे जपानचा आशियातील एकमेव सदस्याचा दर्जा गमावणासारखे आहे. या संघटनेमध्ये ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका आणि युरोपियन संघाचे सदस्यत्व आहे.
“जी-7’ची बैठक जूनमध्ये घेण्याचे पूर्वी निश्चित करण्यात आले होते. मात्र करोनाच्या साथीमुळे ही बैठक सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.