क्रिकेटमधून निवृत्तीचाही विचार नाही
रांची – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी लवकरच प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू डॅरेल कुलिनन याच्या क्रिकेट अकादमीत धोनी क्रिकेट प्रशिक्षक व संचालक म्हणून कार्यरत होणार आहे. अर्थात, असे असले तरीही सध्यातरी क्रिकेटमधून निवृत्तीचा कोणताही विचार नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
धोनीने कुलिननच्या अकादमीचा प्रस्ताव स्वीकारला असून येत्या गुरुवारपासून तो आपल्या नव्या भूमिकेत कार्यरत होणार आहे. अर्थात, सध्या करोनाचा धोका कायम असल्याने तो या अकादमीतील युवा खेळाडूंना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे. ही अकादमी ग्रेड ए अकादमी असून खेळाडूंसह विविध स्तरांवरील प्रशिक्षकांनाही धोनी मार्गदर्शन करेल. सध्याच्या क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना नेमक्या कोणत्या गोष्टींचे मार्गदर्शन द्यावे लागते ते धोनी समर्थपणे देऊ शकतो, असा विश्वास कुलिननने व्यक्त केला आहे.
या अकादमीतून आतापर्यंत 200 पेक्षा जास्त खेळाडू पुढे आले असून सध्या हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील विविध राज्यांच्या संघातून खेळत आहेत. तसेच जवळपास 120 प्रशिक्षक या अकादमीतून घडले असून ते विविध क्लबशी करारबद्ध झाले आहे. हेच या अकादमीचे यश आहे. आता धोनीसारखा महान खेळाडू अकादमीशी जोडला गेल्याने नव्या पिढीला संघाचे नेतृत्व कसे करायचे व त्याचवेळी आपली कामगिरीदेखील कशी सातत्यपूर्ण राखायची याचे धडे धोनीकडून मिळतील, असेही कुलिनन म्हणाला.