नवी दिल्ली :- जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून (मंगळवार) सुरु होत आहे. दुखापतीतून पूर्ण सावरलेला भारताचा राष्ट्रीय विजेता एच.एस. प्रणोय या स्पर्धेद्वारे नव्या मोसमात पुनरागमन करत आहे. त्याच्याकडून या स्पर्धेत अव्वल खेळाची अपेक्षा आहे.
तसेच भारताचा अन्य एक स्टार खेळाडू लक्ष्य सेन हा देखील या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी ही स्पर्धा चांगला सराव ठरणार आहे.
पाठीला झालेल्या दुखापतीमुळे प्रणोयला डेन्मार्क व फ्रेंच स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ब्रॉंझपदक मिळवले होते मात्र, त्यानंतर त्याला दुखापतीचा सामना करावा लागला होता.
स्पर्धेत लक्ष्य सेनला तिसऱ्या मानांकित जपानच्या कोडाई नाराओकाचा सामना करावा लागणार आहे.पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सातव्या मानांकित भारतीय बॅडमिंटनपटू प्रणोयचा सामना हाँगकाँगच्या बिगरमानांकित ली चेक युईशी होणार आहे.
पहिली फेरी…
१. लक्ष्य सेन विरुद्ध कोडाई नाराओका (जपान) – १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० AM – कोर्ट १
२. एचएस प्रणॉय विरुद्ध ली चेउक य्यू (हाँगकाँग) – १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० नंतर – कोर्ट २