पुणे – छोट्या लोकांची मोठी बॅंक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जनता सहकारी बॅंक लि. पुणे ची 72 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. 29 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ही माहिती बॅंकेचे अध्यक्ष माधव माटे यांनी आज येथे दिली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅंकेच्या उपाध्यक्षा अलका पेटकर, संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर सहभागी झाले होते. अध्यक्ष माधव माटे म्हणाले, 2020-2021 या आर्थिक वर्षात संपूर्ण बॅंकिंग क्षेत्राला कोरोनाच्या समस्येला तोंड द्यावे लागले. त्याचा परिणाम बॅंकेच्या एकूण अर्थिक परिस्थितीवर झालेला दिसून आला.
31 मार्च 2021 अखेर बॅंकेचा एकूण व्यवसाय (ठेवी + कर्ज) रु. 14321.48 कोटी इतका झाला. मागील वर्षी (31 मार्च 2020 अखेर) तो रु. 14157.96 कोटी इतका होता. बॅंकेला 31 मार्च 2021 अखेर रु. 201.87 कोटीचा परिचालनात्मक नफा (ऑपरेटींग प्रॉफिट) झाला. तर रु. 23 लाख इतका निव्वळ नफा झाला. 31 मार्च 2021 अखेर बॅंकेच्या ठेवी रु. 9341.29 कोटी होत्या, तर बॅंकेने या कालावधीत रु. 4980.19 कोटीचे कर्ज वितरण केले. बॅंकेची गुंतवणूक 31 मार्च 2021 अखेर रु. 3849.42 कोटी पर्यंत पोहोचली.
मार्च 2021 अखेर बॅंकेच्या नेट एनपीएचे प्रमाण 7.06 टक्के नोंदवले गेले. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत बॅंकेची ही कामगिरी समाधानकारक म्हणावी लागेल.
जनता सहकारी बॅंक लि. पुणेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात एकूण 71 शाखा आणि 6 ऑफस; एटीएम कार्यरत आहेत. बॅंक आपल्या ग्राहकांना सर्व शाखांमधून इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, एनईएफटी, आरटीजीएस, विमा अशा आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देते. या सर्व सुविधांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.