बीड – मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस मराठवाड्यात धुमाकूळ घालत आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहाणी करत आहेत. भाजपनेत्या पंकजा मुंडे देखील नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करत होत्या. मात्र त्यांनी तब्येतीचं कारण देत दौरा थांबवला आहे. मात्र त्यांचा दौरा देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याच्या वेळीच थांबल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
पंकजा मुंडे यांची अचानक प्रकृती खराब झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुढील चार दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाडा दौरा सुरू होण्याच्या आधीच पंकजा यांनी दौऱ्यातून काढता पाय घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Unwell..tonsillitis n blisters in my throat adviced strick voice rest for 2 to 4 days … can’t take calls or meet in person..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 1, 2021
पंकजा यांनी एक ट्विट केलं असून त्यात त्या म्हणतात की, घशाला त्रास होत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पुढील 2 ते 4 दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला, त्यामुळे कुणाचेही फोन कॉल घेऊ शकत नाही किंवा वैयक्तिकरित्या भेटू शकत नाही’.
देवेंद्र फडणवीस पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात त्यांच्यासोबत पंकजा मुंडे दिसणार नाही.
दरम्यान मागील अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले होते. मात्र त्यांचे राजीनामे परत करण्यात आले होते. आता ऐनवेळी दौरा रद्द झाल्याने नाराजी कायम असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.