जामखेड – जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत भाजपला व राष्ट्रवादी कॉंग्रेसला समसमान प्रत्येकी 9 जागा मिळाल्या. या निवडणुकीत कोणाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता सभापती – उपसभापतीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चोबांधणी सुरू झाली आहे. दि. 16 मे रोजी पदाधिकाऱ्यांची निवड होणार असून या निवडणुकीत काय चमत्कार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जामखेड बाजार समितीच्या 18 संचालकपदांसाठी नुकतीच निवडणूक झाली. यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला 9 जागा तर आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला 9 जागेवर उमेदवार विजयी झाले होते. बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी उभय गटांकडून विविध पर्यायांवर चाचणी केली जात असून अंतिम वेळी मात्र चिठ्ठीचा कौल मान्य करण्याची मानसिकता दाखवावी असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला जात आहे.
या निवडणुकीत दोन्ही पॅनलला समसमान जागा मिळाल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.मतमोजणी दिवशीच दोन्ही गटांनी विजयी उमेदवार सहलीसाठी पाठवले आहेत. आमदार शिंदे यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांची साथ मोलाची ठरली. तर, आमदार रोहित पवारांबरोबर जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात यांनी ही निवडणूक एकत्र लढवली. या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदार संघात 11 पैकी सात जागा मिळवत यश आले. व्यापारी मतदार संघाच्या दोन्ही जागावर आमदार पवारांचे वर्चस्व राहिले. त्यामुळे आमदार पवार यांना नऊ जागांवर समाधान मानावे लागले.
तसेच, भाजपला सोसायटी मतदार संघात 11 पैकी चार, तर ग्रामपंचायत मतदारसंघात चारपैकी चार जागा मिळाल्या, तर हमाल मापाडी मतदार संघात एक जागा मिळाली. आमदार प्रा. राम शिंदेंना अशा नऊ जागांवर यश आले. जामखेड बाजार समितीमध्ये पूर्ण बहुमत कुणालाच नसल्याने दोन्ही गटाला समान जागा मिळाल्याने ईश्वरी चिठ्ठी निघणार की घोडेबाजार होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. परंतु, ग्रामपंचायत मतदारसंघात आमदार पवार यांना एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आमदार रोहित पवारांना 18 जागांपैकी नऊ जागांवर समाधान मानावे लागले.
तर, आमदार प्रा. राम शिंदेंना व्यापारी मतदार संघात दोनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने व्यापाऱ्यांनी आमदार शिंदेंना डावलले असल्याचे चित्र आहे. बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या वेळेस पद वाटपाबाबत धक्कातंत्रांचा वापर झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. तशाही या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नाहीत. त्यादृष्टीने सर्वच पक्ष ऍलर्ट मोडवर असून, सभापती, उपसभापती निवडीच्या तारखेकडे मात्र राजकारण्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.