जालना – जिल्ह्यातील निकळक येथील महिला तलाठी यांना 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. रेखा पुरुषोत्तम मानेकर (वय 32, रा. समर्थनगर, जुना जालना) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठीचे नाव आहे. मानेकर यांनी सातबारा उताऱ्यावरील अज्ञान पालक कर्ता (अपाक) शेरा कमी करून देण्यासाठी लाच मागितली होती. एसीबीने ही कारवाई मानेकर यांच्या बदनापूर येथील खासगी कार्यालयात केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील अपाक शेरा कमी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र तलाठी यांनी शेरा कमी न केल्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा लेखी अर्ज केला. त्यावेळी मानेकर यांनी या कामासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
लाचेची रक्कम मानेकर यांच्या बदनापुर शहरातील हुसेननगर येथील खासगी कार्यालयात स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी रेखा मानेकर यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर बदनापुर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना एसीबीचे पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे, गजानन घायवट, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, गणेश चेके, ज्ञानदेव जुंबड, गजानन खरात, अतिक तिडके, गजानन कांबळे, शिवलिंग खुळे, संदीपान लहाने, जावेद शेख, विठ्ठल कापसे यांच्या पथकाने केली.