कराड -गणेशोत्साव चारदिवसांवर आला असल्याने कराड नगरपालिकेकडून उत्सवकाळातील उपययोजना युद्धपातळीवर सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या वतीने यावर्षीही गणेश उत्सवात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यासाठी शहरात विविध भागात 21 ठिकाणी जलकुंड ठेवण्याचे काम सुरु झाले आहे. याही वर्षी नगरपालिकेने शहरातील विविध भागात लोखंडी जलकुंड ठेवण्याचे नियोजन केले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या गणेश मूर्तींचे जलकुंडात विसर्जन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
कराड शहरात पर्यावरण पूरक गणेश विसर्जना बरोबर मूर्ती जलकुंडात विसर्जित करण्याची संकल्पनेलाही मोठा प्रतिसाद नागरिक देत असतात. गतवर्षि नागरिकांनी आपल्या गणेश मूर्तीचे विधीवत पूजा करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे गणेश मूर्ती जमा केल्या होत्या. यासाठी कराड नगरपालिकेने शहरात विविध प्रभागामध्ये गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था केली होती. या संकल्पनेस नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
याही वर्षी नागरिकांनी तसाच प्रतिसाद द्यावा असेही आव्हान नगरपालिकेने केले आहे. मुख्य कराड शहरासह हद्दवाढ भागातील शिक्षक कॉलनीत ईदगाह रस्त्याच्या कोपऱ्यावर, दौलत कॉलनी, पोस्टल कॉलनी, खराडे कॉलनी, शिवाजी हाउसिंग सोसायटी येथे लोखंडी जलकुंड ठेवण्यात येणार आहेत. शाडूंच्या गणेश मूर्तीसाठी नगरपालिकेकडून स्वतंत्र शेततळे निर्माण करण्यात येणार असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीसाठी देखील स्वतंत्र शेततळे निर्माण करण्यात येणार आहे.
येथे असणार आहेत जलकूंड..
कराड शहरातील सोमवार पेठेमध्ये कृष्णा घाट व भैरोबा गल्ली मध्ये तसेच मंगळवार पेठेत कृष्णा नाक्यावर व पी डी पाटील पाणीपुरवठा संस्थे शेजारी तर शुक्रवार पेठेत रंगारवेस चौकात तसेच विठ्ठल चौकासह नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशन नंबर दोन शेजारील मोकळ्या जागेत जलकुंड ठेवण्यात येणार आहेत. शनिवार पेठेत दत्त चौक, कोयनेश्वर मंदिराजवळ, दैत्य निवारणी मंदिराजवळ, शाहू चौकात, कोल्हापूर नाक्यावर, कार्वे नाक्यावरील पाण्याचे टाकी शेजारी, पी डी पाटील उद्यानाजवळ मार्केट यार्ड गेट नंबर 1 शेजारी हे लोखंडी जलकुंड ठेवण्याचे काम सुरु आहे.