नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरातील डॉ. हेडगेवार भवनची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला नागपूरच्या “एटीएस’ने जम्मू काश्मीरमधून अटक केली आहे. रईस अहमद शेख असादुल्ला शेख असे अटक केलेल्या 26 वर्षीय दहशतवाद्याचे नाव आहे. त्याने गेल्यावर्षी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवनाची रेकी केली होती आणि त्याचे व्हिडीओ पाकिस्तानातील हस्तकाला पाठवले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मूळ जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरा येथील रहिवासी असलेल्या शेख याला “एटीएस’ने अलिकडेच ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे गेल्या दोन दिवसांपासून कसून चौकशी केल्यावर त्याने या संदर्बातील माहिती सांगितली. पाकिस्तानातील ओमर नावाच्या ऑपरेशनल कमांडरसाठी ही रेकी केल्याचे त्याने सांगितले. नवाबपूर भागातील अड्ड्यावर जैश ए मोहम्मदच्या अड्ड्यावर हा हस्तक असल्याचेही त्याने सांगितले.
कशी केली होती रेकी…?
शेख गेल्यावर्षी 13 जुलै रोजी दिल्ली-मुंबई-नागपूर मार्गे विमानाने आला होता. तो सीताबर्डी भागातील हॉटेलात राहिला. नागपूरात एक स्थानिक हस्तक मदत करेल, असे आश्वासन ओमर याने त्याला दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्याला कोणीही स्थानिक मदतनिस भेटला नाही. त्यामुळे त्याने स्वतःच पहाणी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
14 जुलै रोजी शेख याने गुगल मॅपच्या आधारे रशीमबाग शोधून काढले. पाकिस्तानातील हस्तकाने त्याला मॅपवरील लोकेशन पाठवले होते. रेशीमबागेच्या मैदानावर पोचताच त्याने मोबाईल कॅमेरा ऑन केला. फोन कानाजवळ धरून “फोनवर बोलत असल्याचे’ भासवून त्याने चित्रीकरण केले. हा व्हिडीओ त्याने व्हॉट्स ऍपद्वारे पाकिस्तानातील हस्तकाला पाठवला.
मात्र त्या व्हिडीओची गुणवत्ता खराब असल्याने त्याला पुन्हा चित्रीकरण करण्यास सांगितले गेले होते. पण पोलिसांच्या भीतीने शेख याने तसे करण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी तो विमानाने श्रीनगरला परत गेला.