जुन्नर -स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर 100 फुटी भगवा ध्वज लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे.
तसेच शिवनेरी व लेण्याद्री येथे रोप वे उभारण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात केंद्राच्या पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत विशेष संयुक्त बैठक घेऊन निर्देश दिले जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी दिले.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशन काळात मतदारसंघातील विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी (दि. 5) केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली.
यावेळी लेण्याद्री व शिवनेरी गडावर जाण्यासाठी रोप वे उभारणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून जुन्नर तालुका विकसित करणे, भक्ती-शक्ती कॉरिडॉर आदी प्रकल्पांसंदर्भात चर्चा केली.
त्या अनुषंगाने शिवनेरी किल्ला, लेण्याद्री डोंगरावरील बौद्ध लेणी समूह, अष्टविनायक गणपती, धरणांची साखळी, आदींची माहिती डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री रेड्डी यांना दिली.
खासदार कोल्हे यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत शिवनेरी किल्ला व लेण्याद्री डोंगरावर रोपवे बांधण्यासाठी गडकरी यांनी सीआरएफमधून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती.
त्यावर मंत्री रेड्डी यांनी याविषयी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. रोपवेचा डीपीआर राज्य सरकारकडून तयार झाल्यास याबाबतची कार्यवाही सुलभ होईल असे सांगितले.
भक्ती शक्ती कॉरिडॉरची संकल्पना होणार साकार
शिरूर लोकसभा मतदारसंघातील भक्ती-शक्ती कॉरिडॉरची संकल्पना मंत्री रेड्डी यांना आवडली. शिवनेरी, वढु बुद्रूक, तुळापूरसारखी ऐतिहासिक स्थळे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र श्री भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर,
रांजणगाव व थेऊर येथील अष्टविनायक गणपती, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असलेले आळंदी, निमगाव खंडोबा अशा भक्ती स्थळांचे कॉरिडॉर तयार केल्यास पर्यटनासाठी मोठी संधी असल्याचे मत केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केले.