संगमनेर, (प्रतिनिधी) – संगमनेर मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन स्व. उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘प्रेरणा दिन’ सोहळ्याचा समारोप संगमनेर महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांच्या संचाने सादर केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमातील सर्वच कलावंतांनी आपले कलाकौशल्य पणाला लावून रसिकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व मर्दानी खेळांचे विलोभनीय दर्शन घडविले. त्यामुळे प्रेरणा दिन सोहळा मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला.
मालपाणी लॉन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात सलग दोन तास हजारो प्रेक्षकांना या कलाकारांनी वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवले. अफजलखान वधाचा पोवाडा व नाट्य रुपांतरण अनुभवताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला. हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विशाल ढगे याने, अफजल खानाची भूमिका जितेश दारोळे याने तर खणखणीत पहाडी आवाजाची शाहीर म्हणून ऋतुजा विवेक सर्वज्ञ हिची भूमिका लक्षवेधी ठरली.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आगळावेगळा ‘बुरगुंडा’ सादर करणारी कलाकार दिव्यांशी गवांदे हिच्या सादरीकरणास प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सर्वात शेवटी शिवराज्याभिषेक सोहळ्याने तर कार्यक्रम रसिकांच्या मनावर कोरला गेला, इतके अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.
महाराष्ट्राची लोककला असलेल्या भूपाळीपासून भैरवीपर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबरोबरच अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा नृत्य-नाट्य अविष्कार महाराष्ट्राची उत्तुंग वैभवशाली लोकपरंपरा दाखवणारा एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरला. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रेक्षकांनी अनेकदा टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहवर्धक घोषणाबाजी करून कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिल्याने उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, बँकेचे चेअरमन संतोष करवा, व्हा. चेअरमन प्रकाश कलंत्री, संचालक प्रकाश राठी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे आदी उपस्थित होते. संजय मालपाणी यांनी केलेल्या छोटेखानी भाषणामध्ये स्थानिक कलाकारांना संगमनेर मर्चंट बँकेने त्यांची कला सादर करण्यास संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रकाश राठी यांनी तर आभार प्रकाश कलंत्री यांनी मानले.