भुवनेश्वर – ओडिशाचे कायदा मंत्री जगन्नाथ सारका यांनी नुकतेच विधानसभेत सांगितले की पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या (Jagannath Puri Temple) नावावर ओडिशा आणि इतर सहा राज्यांमध्ये 60,822 एकरपेक्षा जास्त जमीन आहे.
सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) आमदार प्रशांत बेहरा यांच्या प्रश्नावर मंत्री म्हणाले की ओडिशातील 30 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये 60,426.943 एकर जमीन महाप्रभू जगन्नाथ यांच्या नावावर आहे.
देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये भगवान जगन्नाथाची (Jagannath Puri Temple) यात्रा काढली जाते. त्यात गुजरातसह इतर राज्यांतील अनेक प्रमुख शहरे आहेत. या शहरांमध्ये जगन्नाथाची मंदिरेही आहेत.
सारका म्हणाले की, यापैकी जगन्नाथ मंदिर प्रशासनाला सुमारे 38,061.892 एकर जमिनीचे अंतिम अधिकार रेकॉर्ड प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे सहा राज्यांमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या नावावर 395.252 एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे.
तसेच मंदिर प्रशासनाने राज्यातील विविध तालुक्यांमध्ये देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी 974 खटले दाखल केले आहेत. या प्रकरणाचा अधिकाऱ्यांनी योग्य तपास केल्यानंतर, जगन्नाथ मंदिर कायदा 1955 च्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.