जामखेड – शेतकऱ्याला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून महावितरण कार्यालयातून बोलत आहे. असे सांगत तुमचे वीजबिल सिस्टीममध्ये अपडेट झालेले नाही. ते करण्यासाठी मोबाईलमध्ये ‘क्विक सपोर्ट’ नावाचे ॲप डाऊनलोड करायला सांगत त्यांच्या मोबाईलचा अक्सेस घेत त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ३४ हजारांची रक्कम काढून घेत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत भारत नारायण काकडे (वय ५९, रा. बोर्ले, ता. जामखेड) यांनी शुक्रवारी (दि. २९) नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची ही घटना तीन महिन्यापुर्वी म्हणजे २ जून ते १२ जून या कालावधीत घडली आहे. काकडे यांना अज्ञात व्यक्तीने त्याच्या ९८८३९७४६७९ या मोबाईल वरुन फोन करत आपण ‘महावितरण’ मधून बोलत आहोत आपले लाईट बील सिस्टींममध्ये अपडेट झालेले नाही, ते अपडेट करुन घेवू, असे सांगत क्विक सपोर्ट नावाचे ऑप मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगितले.
फिर्यादीने ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर सदरील व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेत त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ५ लाख ३४ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाईन काढून घेतली. यानंतर देखील काकडे यांच्या निदर्शनास ही बाब लवकर आली नाही.
जेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली आहे, असे समजले तेव्हा त्यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. अलीकडच्या काळात आपण अनेक गोष्टींसाठी ऑनलाईन पेमेंट करण्याला प्राधान्य देतो. ऑनलाईन पेमेंट करणे सुलभ असले तरी सायबर गुन्हेगारांची कायमच अशा प्रकारच्या व्यवहारांवर नजर असते आणि ते विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करतात. आता वीज बिलाच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याच्या घटना घडत आहेत. सायबर भामट्यांनी आता महावितरणची ऑनलाइन बिले भरण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरू केली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपली फसवणूक टाळावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.