जगनमोहन रेड्डींचे कॉंग्रेसशी हातमिळवण्याचे संकेत

अमरावती – आंध्रप्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी कॉंग्रेसशी असलेले मतभेद नजरेआड करून त्या पक्षाला माफ करण्याची तयारी दर्शवली असून यापुढील वाटचालीत कॉंग्रेसशी आघाडी करण्याचे संदेश त्यांनी दिले आहेत. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी कॉंग्रेसने मान्य केली तर त्यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्यात आपल्याला अडचण नाही असे ते म्हणाले. त्यांनी आपला जो अपमान केला आहे तो विसरून त्यांना माफ करण्याचीही आपली तयारी आहे असे त्यांनी म्हटले आहे.

एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की माझ्या मनात कोणाही विषयी द्वेष भावना नाही. मी कॉंग्रेसला माझ्या मनातून माफी दिली आहे. माझे राज्य आणि माझ्या राज्याला विशेष दर्जा हेच सध्या आपले प्राधान्य आहे असे ते म्हणाले.त्यांच्या या विधानावर प्रतिक्रीया देताना प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांनी आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे त्यामुळेच जगनमोहन यांचे मतपरिवर्तन झाले असावे. त्यांच्यातील या मतपरिवर्तनाचे स्वागत असून त्यांनी आता कॉंग्रेस मध्ये परतावे अशी सुचनाही प्रदेश कॉंग्रेसने केली आहे. भारतीय जनता पक्षाने आणि टीडीपी पक्षाने अजून त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रीया दिलेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.