मुंबई – बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आली आहे. नवी दिल्ली येथे सुमारे पाच तास तिची कसून चौकशी करण्यात आली आहे. “भूत पुलिस’ फेम अभिनेत्री जॅकलीनची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ही चौकशी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळासोबत आता बॉलिवूडमध्ये सुद्धा मनी लॉंड्रिंग प्रकरणाचे धागे दोरे मिळण्यास सुरूवात झालेली आहे.
जॅकलीनची “भूत पोलीस’मधील सह-कलाकार यामी गौतमला ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा अंतर्गत कथित अनियमिततांबाबत तिचं जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. आता यानंतर जॅकलीनला देखील ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. गेल्या पाच तासांपासून ईडीकडून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची चौकशी करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या बॅंक खात्यात एका परदेशी संस्थेकडून तब्बल 1 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम आली होती. यात फेमा मार्गदर्शक तत्वांचे कोणतेही पालन करण्यात आलेले नाही. यामी गौतमची चौकशी केल्यानंतर तिचीच सहकलाकार जॅकलीन फर्नांडिसला ईडीने चौकशीसाठी बोलावून घेतले. मात्र, जॅकलीनच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.