मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी सचिन वाझेची पुन्हा कस्टडी मागणारा अर्ज विशेष एनआयए कोर्टाने सोमवारी फेटाळून लावला. परंतु उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात भरती होण्यास परवागनी देत मोठा दिलासा दिला आहे.
याप्रकरणात झालेल्या अटकेनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह पोलीस निरिक्षक सुनील मानेची पुढील चौकशी करण्यासाठी पुन्हा कस्टडी देण्याची मागणी करत या प्रकरणाचा तपास करणा-या एनआयएने कोर्टात अर्ज केला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी हा अर्ज फेटाळून लावला.
तसेच या सुनावणीत सचिन वाझेने आपल्या प्रकृती अस्वस्थ्याचा दाखला देत कोर्टापुढे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला. सचिन वाझेला वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सचिन वाझेला हृदयरोगाचा त्रास असून त्याच्या उपचारांसाठीच वाझेने अर्ज केला होता.
या सुनावणीत आपली बाजू मांडताना सचिन वाझेने न्यायालयात सांगितले की आपला फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे कोठडीतच मृत्यू होऊ नये, अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला तातडीने योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, शहरी नक्षलवाद प्रकरणातील 84 वर्षीय आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा काही महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.