- शहरवासियांमध्ये “करोना’ची दहशत वाढली
- 23 जणांसह त्यांचे 5 नातेवाईक “वायसीएम’मध्ये क्वारंटाईन; दहाजणांचा शोध सुरू
पिंपरी – पिंपरी- चिंचवड शहर “करोना’ मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच अचानक दिल्ली, निजामुद्दीत येथे तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमाला शहरातील 33 नागरिकांनी उपस्थिती लावल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने त्या नागरिकांना शोध सुरु करण्यात आला. त्यापैकी 23 जणांना ताब्यात घेत महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या पाच नातेवाईकांनाही वायसीएममध्ये दाखल करण्यात आले आहे. तर इतर 10 जणांचा शोध अद्यापही सुरू आहे. हा प्रकार समोर आल्यामुळे संपूर्ण शहर हादरले असून “करोना’ची धास्ती आणखी वाढली आहे.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहरात राज्यातील सर्वाधिक करोना बाधित रुग्ण होते. महापालिका, पोलीस प्रशासन आणि करोना कक्षाच्या माध्यमातून अंत्यत योग्य उपाययोजना केल्यामुळे शहरात गेल्या 12 दिवसांत एकही रुग्ण सापडला नव्हता. तर करोनाबाधित 12 रुग्णांपैकी दहा रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले होते. सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे या रुग्णाच्या दुसऱ्या अहवालाची प्रतिक्षा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला होती. शहरात एकच रुग्ण शिल्लक राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शहर येत्या काही दिवसातच “करोना’मुक्त होण्याची आशा व्यक्त केली जात होती.
मात्र, दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातच्या “इज्तेमा’ या धार्मिक कार्यक्रमाला शहरातील तब्बल 36 जणांनी हजेरी लावल्याची माहिती शासन, विभागीय आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर एकच धावपळ आणि खळबळ उडाली. या कार्यक्रमात देशभरातून नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी काही नागरिकांना “करोना’ची लागण झाली असून काहींचा मृत्यूही झाला आहे. ही माहिती हाती येताच एकच खळबळ उडाली. मंगळवारी रात्री अडीच वाजेपर्यंत महापालिका कर्मचारी, अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
त्यापैकी 23 जणांचा शोध घेत त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या 23 नागरिकांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या 5 नातेवाईकांनाही वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, 36 लोकांची जी यादी शासनाने सादर केली होती, त्यापैकी तीन नागरिक हे शहरातील नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शहरातील 33 पैकी 23 नागरिकांना वायसीएममध्ये दाखल करण्यात आले. यानंतर उर्वरित 10 जणांना शोध पालिका व पोलिसांच्या माध्यमातून बुधवारीही सुरू होता. मात्र या नागरिकांना शोधण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत यश आले नाही. अचानक समोर आलेल्या प्रकारामुळे शहरातही खळबळ उडाली. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे नागरिक शहरातील अनेकांच्या संपर्कात आल्याच्या अफवा निर्माण झाल्यामुळे पालिका प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली होती.
एकाच दिवसात 41 जणांची भरती
दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावणारे 23 जण, त्यांचे पाच नातवाईक व “करोना’ची लक्षणे दिसणारे 13 जण आज महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्वच्या सर्वजणांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उद्यापर्यंत (गुरुवार) या सर्वांचे अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहेत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरातील करोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
95 जणांचे अहवाल प्रतिक्षेत
आजपर्यंत करोनाची लक्षणे दिसणाऱ्या 307 व्यक्तींच्या घशातील द्रव्याचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 253 जणांचे अहवाल महापालिकेला प्राप्त झाले असून 54 जणांचे अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहेत. तर आज 41 रुग्णांची भर पडल्याने एकुण 95 जणांचे अहवाल आजअखेर प्रतिक्षेत आहेत.
दहशतीची छाया
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणारे 33 जण गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाले आहेत. हे सर्वजण शहरातील अनेकांच्या संपर्कात आल्याची भिती असून याच कार्यक्रमाला हजेरी लावून इतर ठिकाणी परतणाऱ्या अनेक व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. तर काहीजण करोना झाल्यामुळे दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झालेल्या काहीजणांनाही करोनाची लागण झाली असावी, अशी भिती व्यक्त होत असून या व्यक्तींच्या संपर्कात आलेले अनेकजण हादरले आहेत. तर शहरातही या विषयाची चर्चा जोरदार रंगल्याने दहशतीची छाया निर्माण झाली आहे.