Live-in Relationships – अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशीपशी (Live-in Relationships) संबंधित प्रकरणात आपल्याला संरक्षण मिळण्याची या प्रकरणातील जोडप्याची मागणी फेटाळून लावत लिव्ह इन रिलेशनशीपच्या संदर्भात कठोर टिप्पणी करत अत्यंत महत्वाचा फैसला दिला आहे.
ही असली नाती अप्रमाणिक असतात आणि केवळ विरूध्द लिंग असणाऱ्या व्यक्तीच्या आकर्षणातून निर्माण झालेली ही नाती यथावकाश केवळ टाइमपासचा प्रकार होतात. सर्वोच्च न्यायालयाने या संबंधांना मान्यता जरूर दिली आहे.
मात्र ही नाती केवळ मोह आणि आकर्षणच असतात. तसेच हे संबंध अत्यंत नाजूक आणि अस्थायी स्वरूपाचे असतात असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
लिव्ह इनमध्ये राहत असलेले 20-22 वर्षांचे जोडपे केवळ दोन महिन्यांच्या अवधीत या नात्याच्या अस्थायीपणाचा गांभीर्याने विचार करू शकत असतील अशी अपेक्षा न्यायालय करू शकत नाही असे न्या. राहुल चतुर्वेदी आणि न्या. मोहम्मद अजहर हुसेन इद्रीसी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
आयुष्य अनेक आव्हानांनी संघर्षाने भरलेले असते त्यामुळे त्याकडे फुलांनी सजवलेली वस्तू म्हणून पाहण्याची चूक करता कामा नये अशी शेरेबाजी करत मुस्लिम युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहु इच्छित असलेल्या हिंदू मुलीने त्यांना संरक्षण दिले जाण्याची केलेली मागणी फेटाळली.
वयाच्या 22 व्या वर्षी आणि केवळ दोन महिन्यांच्या एकत्र राहण्याच्या कालावधीवरून या नात्याच्या परिपक्वतेचे मूल्यांकन करता येऊ शकत नाही असे त्यांना सांगण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या मथूरा येथे राहणाऱ्या 22 वर्षीय मुलीने घर सोडले असून ती आपल्या मुस्लिम मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलीचे अपहरण केले असल्याचा त्यांचा आरोप आहे.
मात्र ही तक्रार रद्द केली जाण्याची मागणी करत संबंधित मुलगा आणि मुलीने उच्च न्यायालयात धाव घेतली असून संरक्षणाची मागणी केली आहे. आम्हाला कुटुंबीयांपासून धोका असून सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले जावेत अशी त्यांची याचिका होती, ती फेटाळण्यात आली.