विधानसभा, विधान परिषद असा प्रस्ताव होता

अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर केली टीका

रेडा- इंदापूरमध्ये दोन आमदार करूयात एकाला विधानसभा देऊ व एकाला विधान परिषद. कायमचा वाद मिटवू, असा प्रस्ताव कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे मांडला होता. पण, हर्षवर्धन पाटील भाजपत गेले. या गोष्टीचा मतदारांनी विचार करणे गरजेचे आहे. बावडेकरांनो स्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन अशा नेत्यांवर विश्‍वास ठेवू नका. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनो तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, असा सल्लाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ बावडा (ता. इंदापूर) येथे आयोजित प्रचारसभेत पवार बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले. तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, बबनराव खराडे, रत्नाकर मखरे, बाळासाहेब कोकाटे, शिवाजीराव इजगुडे, शशिकांत तरंगे, संजय सोनवणे, हनुमंत कोकाटे, श्रीधर बाब्रस, उमेश घोगरे, अजित टिळेकर, श्रीकांत दंडवते, प्रफुल्ल चव्हाण, नागेश गायकवाड, जिग्नेश कांबळे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, स्व. घोलप, शंकरराव पाटील भाऊ हे कॉंग्रेसच्या विचाराचे होते. ते गांधी घराण्याच्या विचाराचे असल्यामुळे कधीही नेतृत्व बदलले नाही; परंतु, 1995मध्ये हर्षवर्धन पाटलांना विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून आली नाही म्हणून ते अपक्ष लढले. मात्र, दुसऱ्या पक्षात जाऊ दिले नाही. कॉंग्रेस पक्षाचा विचार कधीही भाऊंनी सोडला नाही. हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश स्व. भाऊ घोलप साहेबांना पटला नसता, असे पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रस्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते उमेश घोगरे यांनी केले तर प्रशांत गायकवाड यांनी आभार मानले.

  • काहीही अडचणी येवू द्या मी सज्ज – भरणे
    इंदापूर तालुक्‍यातील पाण्याचे नियोजन व शेतकऱ्यांची काळजी पाटलांना करता आली नाही. बावडा भागात राहतात त्या भागाचा विकासही त्यांनी केला नाही. कुणालाही काही अडचणी येवू द्या, मी सज्ज आहे. सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)