… तर भोरला लाल दिवा मिळेल

विठ्ठल आवाळे : आमदार थोपटेंच्या प्रचारार्थ मतदारांशी साधला संवाद

भोर- भोर विधानसमा मतदारसंघातून महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलाने मतदान करून आमदार थोपटे यांना साथ द्या, भोरला लाल दिव्याची गाडी आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी व्यक्‍त केला.

भाटघर धरण जलाशय भागातील माळेवाडी येथील आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारसभेत मतदारांशी संवाद साधताना आवाळे बोलत होते. यावेळी आमदार संग्राम थोपटे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, संतोष सोंडकर, प्रभाकर लोखंडे, सोमनाथ वचकल, अंकुश वीर, एकनाथ वीर, नामदेव गोळे, नारायण वीर आदी मान्यवरांसह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विठ्ठल आवाळे म्हणाले की, भोर विधानसभा मतदारसंघ हा अतिदुर्गम डोंगरी भागाने वेढलेला राज्यातील अत्यंत कठीण असा मतदारसंघ आहे. असे असतानाही भोर-वेल्हे-मुळशी या तीन तालुक्‍यांत 553 कोटी रुपये खर्चांची विकासकामे करणारा गतीमान आणि कर्तृत्ववान आमदार म्हणून संग्राम थोपटे यांनी नावलौकिक मिळवला आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ वचकल व प्रभाकर लोखंडे यांनी माळेवाडीच नव्हे तर संपुर्ण भाटघर धरण भागातील सर्वच गावे कॉंग्रेसच्या पाठीशी असून 100 टक्‍के मतदान करणार असल्याचे जाहीर केले.आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी नऱ्हे, संगमनेर, तांभाड आदी गांवचा गावभेट प्रचार दौरा करुन मतदारांशी संवाद साधला.

युती सरकारने गेल्या पाच वर्षांत या भागात घमेलेभर खडी तरी टाकली का? शेतकऱ्यांना कर्जमाफी तर सोडाच पण गरिबांच्या खिशावरच यांनी डल्ला मारला आहे. नोटा बंदीने सर्वसामान्य जनतेला यांनी छळले असून यांना दारातही उभे करु नका. तसेच कॉंग्रेसला मत म्हणजेच विकासाला मत हे लक्षात ठेवून सोमवारी (दि. 21) पंजा समोरील बटन दाबून आमदार संग्राम थोपटे यांना मतदान करण्याचे आवाहन विठ्ठल आवाळे यांनी केले.

  • मी याच गावात लहानाचा मोठा झालो आहे. आज मी मते मागायला तर आलो आहेच; परंतु मला तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. भाटघर धरण प्रकल्पग्रस्तांसाठी काम केल्याने यंदा पुन्हा मतदार संधी देतील असा विश्‍वास आहे.
    – संग्राम थोपटे, आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.