मुंबई – महागाई उच्च पातळीवर असूनही रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत व्याजदर वाढ केलेली नाही. यामुळे आगामी काळात भारताला महागाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. मात्र बॅंकेने व्याजदर वाढ करण्यास उशीर केलेला नाही असे एचडीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर बराच परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत भांडवल महाग केल्यानंतर अर्थव्यवस्थेवर आणखी परिणाम झाला असता. त्यामुळे आतापर्यंत बॅंकेने व्याजदर वाढ टाळली आहे.
याचा अर्थ बॅंक महागाई नियंत्रणाकडे दुर्लक्ष करीत आहे असा होत नाही असे त्यांनी सांगितले. या आर्थिक वर्षात बॅंक दोन किंवा तीन वेळा व्याजदर वाढ करण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे रोजगार निर्मिती होते. मागणी वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यासाठी बॅंकेने आतापर्यंत व्याजदरात वाढ न करता भांडवल सुलभता कायम ठेवली आहे. त्यामुळे आता अर्थव्यवस्थेला वेग येऊ लागला आहे.
विविध क्षेत्रातील विक्री वाढत आहे. बॅंक आगामी काळात महागाईला रोखण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेतले जात आहेत असे त्यांनी एका आर्थिक विषयावरील परिसंवादात बोलताना सांगितले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बॅंकेने जाहीर केलेल्या पत धोरणांमध्ये बॅंकेचा रेपो हा मुख्य व्याजदर चार टक्क्यावर कायम ठेवला आहे.
मात्र आगामी काळामध्ये व्याजदरात वाढ करण्याची शक्यता बॅंकेने या पतधोरणात वेळी खुली ठेवली आहे. बॅंकेने पत धोरण जाहीर केल्यानंतर महागाई वाढून 6.95 टक्के इतकी झाली केली आहे. किरकोळ महागाईचा दर आता 17 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर आहे. बॅंक किरकोळ किंमतीवर आधारीत महागाईच्या दराचा पत धोरण ठरविण्यासाठी विचार करीत असते.
भारतातील महागाईची तुलना अमेरिकेतील महागाईशी केली जाते. मात्र ही तुलना बरोबर नाही. अमेरिकेमध्ये चलन वाढ 8.5 टक्क्यापर्यंत गेली आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई प्रथम वाढली लागते. अमेरिकेला पुढील दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात व्याज दरवाढ करावी लागणार आहे. अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण होणार नाही. सध्या कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलरच्या पुढे असले तरी ही परिस्थिती दीर्घ काळ टिकणार नाही. त्यामुळे भारतातील परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येईल असे त्यांना वाटते.