अत्यावश्यक सेवा, पोलीस आणि कोविड १९ साठी काम करणाऱ्यांना वगळले
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली परिसरामध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण आणि कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी वाघोलीतून कामानिमित्त महापालिका क्षेत्रामध्ये जाणाऱ्या कामगार, मजूर, शासकीय अधिकारी कर्मचारी यांना ६ जून ते १२ जून या सात दिवसांच्या कालावधीत पुणे शहर व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवेमधील वैद्यकीय सेवा, पोलीस अधिकारी व कर्मचारी, इलेक्ट्रिक व कोविड १९ च्या अनुषंगाने काम करणारे अधिकरी-कर्मचारी व इतरांना यामधून वगळण्यात आले आहे.
याबाबतचा सुधारित आदेश हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी शुक्रवारी (दि.५) काढला आहे. सदरील आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सात दिवसांसाठी पोलीस, प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने केली जाणार आहे.
हवेली तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर उपाययोजना करण्याबाबत हवेली तालुक्यातील संबंधित अधिकारी यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रालगत ज्या गावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्या गावातील कामगार व शासकीय कर्मचारी दोन्ही महापालिकेमध्ये कामासाठी जात असल्याने त्यांच्यावर बंधने घालणे क्रमप्राप्त असल्याचे सर्वानुमते ठरले.
हवेली कार्यक्षेत्रातील वाघोली, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, कदमवाकवस्ती या शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. उपाययोजना केल्या जात असल्या तरी या गावांमधील शासकीय अधिकारी कर्मचारी, मजूर, कामगार कामासाठी ये-जा करीत असतात. अशा परीस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाघोली, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, कदमवाकवस्ती या गावातील सर्व खाजगी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, मजूर व कामगार यांना ६ जून पहाटे ५ वाजल्यापासून ते १२ जून रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत पुणे व पिंपरीचिंचवड महापालिका क्षेत्रात कामानिमित्त ये-जा करता येणार नसल्याचा आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी बुधवारी (दि.३) काढला होता.
या आदेशामध्ये अंशतः बदल करून जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवेमधील वैद्यकीय सेवा, पोलीस अधिकारी व कर्मचारी, इलेक्ट्रिक व कोविड १९ च्या अनुषंगाने काम करणारे अधिकरी-कर्मचारी व इतरांना यामधून वगळण्यात आले आहे. याव्यतिरिक्त दोन्ही महापालिका हद्दीमध्ये ये-जा करण्यास मनाई असणार आहे. या कालावधीत त्यांना कामाच्या ठिकाणी राहून काम करावे लागणार आहे किंवा स्वतःच्या घरी विलगीकरण करावे लागणार आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वाघोलीतून रांजणगाव, सणसवाडी, कारेगाव व ग्रामीण भागात कामगारांना कामावर जाता येईल.
आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणार…..
हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी काढलेल्या आदेशानुसार आवश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी वगळता इतर कामगारांना पुणे व पिंपरीचिंचवड महापालिका क्षेत्रात ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने केली जाणार आहे. तहसीलदार कार्यालयाकडून शिक्षकांची तपासणी पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तलाठी, ग्रामविकास अधिकारी, लोणीकंद पोलिस व होमगार्डच्या मदतीने शिक्षक आदेशाची अंमलबजावणी करणार आहे. लोणीकंद पोलिसांच्यावतीने खांदवेनगर, लोहगाव रोड व वाघोली गावाच्या एन्ट्री पॉईंटवर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणार आहेत. वाघोलीतून बाहेर जाण्यास व शहरातून वाघोलीत येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.
वाघोलीतील दुकाने व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु राहणार….
उपविभागीय अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानंतर वाघोली परिसरातील सर्व दुकाने १२ जून पर्यंत बंद राहणार असल्याबाबत चर्चा दोन दिवसांपासून गावामध्ये रंगत आहे. मात्र आदेशामध्ये पुणे व पिंपरीचिंचवड महापालिकेमध्ये मजूर, कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ये-जा करण्यास मज्जाव आहे. वाघोलीतील मायक्रो कंटेन्मेंट झोन मधील जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने आणि इतर ठिकाणी शासकीय नियमानुसार दुकाने व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु राहणार आहेत.