तेल अविव – हमासने केलेल्या हल्ल्याबद्दल सौदी अरेबिया, कतार आणि इराणने इस्रायललाच जबाबदार धरले आहे. इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळेच हमासने इस्रायलवर हल्ला केल्याचे या देशांनी म्हटले आहे. मध्यपूर्वेतील बहुतेक देशांनीही इस्रायलवर टीका केली आहे.
इस्रायलच्या ताब्यामधील भूभागामध्ये अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या स्फोटक परिस्थितीवरून सौदी अरेबियाने सावध भूमिका घेतली होती. इस्रायलला संयम बाळगण्याचा सल्लाही दिला होता, असे सौदीच्या राजघराण्याच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. सौदी आणि इस्रायलमधील दीर्घकालापासूनचे तणावाचे संबंध सर्वसामान्य केले जाण्याचे प्रयत्न सुरू असतानाच सौदीने इस्रायलवर टीका केली आहे.
इराणनेही उघडपणे हमासचे समर्थन केले आहे. जगभरातील कोणत्याही देशाने हमासचे इतक्या उघडपणे समर्थन केलेले नाही. या कारवाईबद्दल इराणच्या सल्लागारांनी पॅलेस्टाईनचे अभिनंदन केले आहे. हमासच्या समर्थनार्थ संसदेमध्ये संसद सदस्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाण्याचे व्हिडीओ इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या वेबसाइटवर पोस्ट केले गेले आहेत.
इस्रायलने अल अक्सा मशिदीच्या परिसरात पॅलेस्टाईनच्या नागरिकांवर वारंवार छापे घातल्यामुळेच हा तणाव वाढला, असे म्हणून कतारनेही या संघर्षाला इस्रायललाच जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपातील देशांनी हमासच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि इस्रायलला पाठिंबा दिला आहे.